सोमवार, १ एप्रिल, २०१३

फंडे सीईटीचे!


यंदापासून वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नीट (NEET) प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य आहे. 'नीट' परीक्षेत संपादन केलेल्या गुणांच्या आधारे वैद्यक अभ्यासक्रमातील प्रवेश निश्चित केले जातील..
यंदाच्या वर्षांपासून देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रवेशपद्धतीत एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. तो म्हणजे वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी निकष ठरणारी देशपातळीवर एकच प्रवेशपरीक्षा - नीट (NEET) घेण्यात येणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय, राष्ट्रीय वैद्यक परिषद आणि सीबीएसई यांनी एकत्रितपणे हा निकष निश्चित केला आहे. दिल्लीच्या एआयआयएमएस आणि चंदिगढच्या जेआयपीएमईआर या महाविद्यालयांव्यतिरिक्त देशभरातील सर्व ठिकाणच्या वैद्यक महाविद्यालयांचे प्रवेश 'नीट' परीक्षेतील गुणांच्या आधारे दिले जातील. त्यानुसार, राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांतील प्रवेशही 'नीट'च्या आधारे होतील. या नव्या बदलानुसार, गेल्या वर्षांपर्यंत घेतली जाणारी एमएचटी सीईटी तसेच एआयपीएमटी, एएफएमसी या इतर परीक्षा रद्दबातल ठरल्या असून त्यांची जागा 'नीट' या प्रवेशपरीक्षेने घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून  वैद्यक प्रवेशपरीक्षेसाठीचा हा मोठा बदल आहे.
वैद्यक प्रवेशाचा निकष ठरलेल्या या 'नीट' परीक्षेचा अभ्यासक्रम हा 'सीबीएसई'च्या अकरावी आणि बारावीच्या पदार्थविज्ञानशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांच्या अभ्यासक्रमावर बेतलेला आहे. 'नीट' परीक्षेचे स्वरूप बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित असेल; ज्यात उत्तराचे चार पर्याय दिलेले असतील आणि त्यातील एका अचूक उत्तराची निवड विद्यार्थ्यांने करणे अपेक्षित आहे. या परीक्षेच्या गुणपद्धतीत निगेटिव्ह मार्किंग असल्याकारणाने चुकलेल्या उत्तरांसाठी गुण गमावण्याचा फटका विद्यार्थ्यांना बसेल. त्यामुळे नेमके उत्तर माहीत असलेले प्रश्नच विद्यार्थ्यांनी सोडवावेत.
'नीट' परीक्षेची काठिण्यपातळी ही 'एआयपीएमटी'सारखी असणार आहे, जी 'एमएच-सीईटी'- या राज्यपातळीवर आतापर्यंत घेतल्या गेलेल्या प्रवेशपरीक्षेच्या तुलनेत जास्त कठीण मानली जाते. त्यामुळे अर्थातच १९९९ पासून २०१२ पर्यंत राज्यात जी 'एमएच-सीईटी' ही राज्यभरातील वैद्यक पदवी प्रवेशासाठीची सीईटी घेतली गेली त्या तुलनेत 'नीट' या प्रवेशपरीक्षेची काठिण्यपातळी अधिक असणार, यात शंका नाही. आणि म्हणूनच या नव्या परीक्षेला सामोरे जाताना अभ्यासाच्या पद्धतींमध्येही विद्यार्थ्यांनी योग्य बदल करायला हवा.
'नीट' परीक्षेची परीक्षापद्धती जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार एकूण १८० प्रश्न विचारले जातील. त्यातील प्रत्येकी ४५ प्रश्न हे पदार्थविज्ञानशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतिशास्त्र आणि प्राणिशास्त्र (physics, chemistry, botany and zoology) या विषयांवर विचारले जातील. अचूक उत्तराला चार गुण दिले जातील आणि उत्तर चूक असेल तर त्यासाठी प्रत्येकी एक गुण वजा करण्यात येईल. हे लक्षात घेता विद्यार्थी 'नीट' परीक्षेत - १८० ते + ७२० इतके गुण संपादन करू शकतो.  उलटपक्षी, आतापर्यंत घेतल्या गेलेल्या 'एमएच-सीईटी' परीक्षेत विद्यार्थ्यांला राज्यातील १८ सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी २०० पैकी १७० हून अधिक गुण मिळवणे आवश्यक ठरत होते. यंदाच्या वर्षी 'नीट' परीक्षेत एकूण ७२० गुणांपैकी ३०० गुण व त्याहून अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांला राज्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवणे शक्य होईल, असा अंदाज व्यक्त केला जातो.
'नीट' परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना पुढील टिप्स नक्कीच उपयोगी ठरतील -
१.    'नीट'मधील फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांला मॅथ्समधील वेक्टर्स, डिफरन्शियल अ‍ॅण्ड इन्टग्रल कॅलक्युलस, क्वान्ड्राटिक इक्वेशन्स, प्रोग्रेशन्स अ‍ॅण्ड स्ट्रेट लाइन या पाठांचा अभ्यास उत्तमरीत्या असणे आवश्यक आहे. म्हणजेच 'नीट' देणाऱ्या परीक्षार्थीने गणित विषयाचा सविस्तर अभ्यास करायला हवा. 'नीट' देणारे विद्यार्थी बरेचदा गणिताचा अभ्यास न करण्याची घोडचूक करतात. ती चूक विद्यार्थ्यांनी टाळायला हवी.
२.    फिजिक्स, फिजिकल केमिस्ट्री आणि ऑरगॅनिक केमिस्ट्री या विषयांचा अभ्यास करताना पाठांतराऐवजी ते समजून घेण्यावर भर द्यावा. केवळ स्मरणशक्ती अथवा फॉम्र्युला सबस्टिटय़ूशन पद्धतीऐवजी संकल्पना समजून घेऊन उपयोजन (अ‍ॅप्लिकेशन) कौशल्य वापरावे. अशा पद्धतीने अभ्यास केल्यास या विषयामधील प्रश्न सोडवणे परीक्षार्थीला सुलभ जाईल.
३.    अनेक विद्यार्थी ऑरगॅनिक केमिस्ट्री आणि इनऑरगॅनिक केमिस्ट्रीमधील रिअ‍ॅक्शन्स या नुसत्या पाठ करतात. मात्र 'नीट' परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांने सुरुवातीला रिअ‍ॅक्शन मेकॅनिझम इन ऑरगॅनिक केमिस्ट्रीची तत्त्वे आणि इनऑरगॅनिक केमिस्ट्रीमधील बॉण्डिंग, रिडॉक्स आणि पिरिऑडिक टेबल ही तत्त्वे पूर्णत: समजून घ्यावीत आणि त्यात पारंगत व्हावे. त्यामुळे केमिस्ट्रीचा अभ्यास करताना पाठांतराची गरज विद्यार्थ्यांना भासणार नाही.
४.    'नीट'च्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांनी अरिहंत, दिशा, टाटा मॅक्ग्रॉ हिल्स, एमटीजी, सेन्गेज, पीअरसन्स आदी राष्ट्रीय पातळीवरील प्रकाशकांच्या पुस्तकांचा उपयोग करावा. राष्ट्रीय परीक्षांसाठी शिकवणीसाठी अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन घ्यावे. जे शिक्षक राज्य पातळीवर परीक्षांपुरतेच शिकवतात, त्यांना 'नीट' परीक्षेच्या अभ्यासक्रमातील अनेक धडे शिकवता येणे शक्य असेलच, असे नाही.
५.     बायोलॉजी हा माहिती देणारा विषय असून त्याच्या योग्य नोट्स काढणे आणि या विषयाचा वारंवार अभ्यास करणे आवश्यक ठरते, ज्यामुळे हा विषय चांगलाच लक्षात राहतो. त्याच वेळेस बायोलॉजी या विषयातील अनेक संकल्पनांचे पाठांतर करण्याऐवजी त्या सविस्तरपणे समजून घेणे आवश्यक ठरते. ह्य़ुमन जेनेटिक्स, जेनेटिक इंजिनीअरिंग, बायोइन्फॉर्मेटिक्स, बायोमेडिकल इन्स्ट्रमेन्टेशन, अ‍ॅनाटोमी ऑफ कॉर्डेट्स अ‍ॅण्ड नॉन कॉर्डेट्स, बायोटेक्नोलॉजी आणि मॉलीक्युलर बायोलॉजी या विषयांकडे सर्वसाधारणपणे
सर्वाधिक विद्यार्थी दुर्लक्ष करणे पसंत करतात. मात्र हे विषय महत्त्वाचे आहेत आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली या विषयांचा सविस्तर अभ्यास करावा.
६.    'नीट' परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांला बायोलॉजी या विषयाच्या अनेक संकल्पना उत्तमरीत्या माहीत असणे अत्यावश्यक आहे. फिजिक्समधल्या थर्मोडायनॅमिक्स आणि इलेक्ट्रोमॅग्नॅटिक्स तसेच केमिस्ट्रीतील आयोनिक इक्विलिब्रिया, ऑरगॅनिक केमिस्ट्री आणि बायोमॉलिक्यूल्स या धडय़ांचा बायोलॉजीच्या अनेक संकल्पना समजून घेण्यास उपयोग होतो.
७.    'नीट' परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी केमिस्ट्री आणि बायोलॉजी या विषयांच्या अभ्यासासाठी 'एनसीईआरटी'च्या पाठय़पुस्तकांचा सविस्तर अभ्यास करायला हवा.
८.    'नीट' परीक्षेचा पॅटर्न लक्षात घेत परीक्षेपूर्वी
तीन महिने अनेक चाचणीपरीक्षा दिल्या तर विद्यार्थ्यांना परीक्षेचा चांगलाच सराव होईल आणि 'नीट'मध्ये विचारल्या गेलेल्या अमुक एका प्रश्नाचे उत्तर आपण लिहू शकतो का, याचाही अंदाज विद्यार्थ्यांना येऊ शकेल. ही निर्णयक्षमता विद्यार्थ्यांमध्ये येण्यासाठी चाचणी परीक्षांमधील आपल्या कामगिरीचे सातत्याने विश्लेषण करणे आवश्यक ठरते.
वर नमूद केलेल्या बाबी लक्षात घेतल्या तर वैद्यकीय अभ्यासक्रमांकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांना 'नीट' परीक्षा देणे आणि त्यातील आपल्या कामगिरीचा आलेख उंचावणे सहजशक्य ठरेल.  
संचालक, आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्र -
दुर्गेश मंगेशकर