शुक्रवार, ३० मे, २०१४

बारावी नंतर काय ?


सायन्स बारावी उत्तीर्ण झाल्यावर कळतं की, आपली ही साइडच नाही. आपल्याला काही रसच नाही सायन्समध्ये. कॉर्मसला गेलेल्या विद्यार्थ्यांचंही असंच होतं. नंतर कळतं की, या आकडेमोडीत आपलं काही मन लागत नाही. पण बारावीनंतर करायचं काय हे कळत नाही. जी शाखा आवडत नाही त्याच शाखेची पदवी घ्यावी लागणं म्हणजे तर शिक्षाच आणि पुन्हा भविष्यात करिअर लटकण्याची शक्यता. तसं होऊ नये म्हणून बारावीनंतरच आपल्या आवडीचं करिअर आणि अभ्यासक्रम निवडण्याची संधी मिळू शकते. त्यासाठी आपले बारावीतले मार्क हा तर आपला हुकमाचा एक्का ठरूच शकतो, कारण मार्क तुलनेने कमी असले तरी चालू शकते. कारण जास्त मार्क मिळवणारे विद्यार्थी त्यांच्या वाटेनं निघून जातात. आणि शिवाय त्या त्या अभ्यासक्रमाच्या एण्ट्रन्स एक्झामचा आधार असतोच. त्यात चांगले मार्क मिळवले तर बारावीत कमी मार्क मिळूनही ऐनवेळी आपल्या करिअरला योग्य ती दिशा देता येऊ शकते. तशी दिशा देणारे हे काही कोर्सेस.

द बॅचलर ऑफ मॅनेजमेण्ट स्टडीज म्हणजेच बीएमएस. मॅनेजमेण्ट या गोष्टीत आपल्याला रस आहे आणि बारावीनंतरची पदवीच या विषयात स्पेशलायझेशन करून घ्यायची, असं तुम्ही ठरवत असाल तर हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

१२+३ असं या अभ्यासक्रमाचं स्वरूप असल्यानं तुम्ही पदवीधर होतानाच एक स्पेशलायझेशन मिळवून नोकरीसाठी सज्ज होता.

महाराष्ट्रातल्या अनेक विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयांत हा अभ्यासक्रम शिकवला जातो.

पात्रता काय.?

बारावीला किमान ५0 टे मार्क.

या अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणारी प्रवेश परीक्षा गुणवत्तेनुसार उत्तीर्ण.

स्कोप काय.?

थेट स्पेशलायझेशन. पदवीधर झाल्यावर तत्काल नोकरीची संधी. आणि मास्टर्स करण्याचीही थेट संधी. पदवीनंतर काय.? हा प्रश्न वयाच्या विशीत पडू नये इतपत तयारी.

-------**-------

सिनेमात काम करण्याचं, अमिताभ बच्चन होण्याचं स्वप्न तर सगळेच जण पाहतात; पण समजा अभिनय न करता सिनेमा बनवण्याचं, दिग्दर्शकच होण्याचं स्वप्न आपण पाहिलं तर.? ते बारावीनंतरच पाहाण्याची संधी तुम्हाला हा अभ्यासक्रम देतो. प्री प्रॉडक्शन, प्रॉडक्शन आणि पोस्ट प्रॉडक्शन हे सिनेमा बनवण्याचे तिन्ही टप्पे हा अभ्यासक्रम शिकवतो. त्यात साउण्ड रेकॉर्डिंग, एडिटिंग, सिनेमॅटोग्राफी, स्क्रिप्ट रायटिंग, डायरेक्शन हे सगळे टप्पेही शिकवले जातात.

पुण्याच्या फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये हा अभ्यासक्रम शिकवला जातो. या विषयात रुची आणि अपार कष्ट करण्याची तयारी असेल तर बारावीनंतरच ही वाट निवडणं उत्तम.

पात्रता काय.?

बारावीत ५0 टे मार्क.

प्रवेश परीक्षेनुसार प्रवेश.

स्कोप काय.?

फिल्म मेकिंग या क्षेत्राचा स्कोप वेगळा काय सांगावा. मात्र, हा अभ्यासक्रम केल्यानं एडिटिंगपासून म्युझिक रेकॉर्डिंगपर्यंत विविध क्षेत्रांत काम करायची संधी मिळू शकते.

-------**-------

बॅचलर ऑफ मास मीडिया

कुठल्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यास बीएमएम अर्थात बॅचलर ऑफ मास मीडिया हा कोर्स करता येतो. पत्रकारिता किंवा जाहिरात या विषयात स्पेशलायझेशनही याच कोर्समध्ये करता येते. हा अभ्यासक्रम फक्त मुंबई विद्यापीठातच शिकवला जात असला, तरी या समकक्ष अभ्यासक्रम महाराष्ट्रातले इतर विद्यापीठही शिकवतात. पुण्यातल्या सिम्बॉयोसिस संस्थेतही हा अभ्यासक्रम शिकवला जातो. पत्रकारिता किंवा जाहिरात या दोन्हीपैकी कुठल्याही एका क्षेत्रात करिअर करायचं, असं तुम्ही नक्की ठरवलेलं असेल, तर हा बारावीनंतर एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

पात्रता काय.?

बारावीत ५0 टे मार्क.

प्रवेश परीक्षेतून निवड होते. ही प्रवेश परीक्षा लेखी असते, त्यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांंना ग्रुप डिस्कशन, मुलाखत या टप्प्यातून जाऊन गुणवत्तेनुसार प्रवेश मिळतो.

स्कोप काय.?

पत्रकारिता आणि जाहिरात यापैकी एका किंवा दोन्ही क्षेत्रांत तुम्ही आवडीप्रमाणे करिअर करू शकता. वर्तमानपत्र, चॅनल्स यासह जाहिरात एजन्सीत नोकरी करू शकता. मात्र त्यासाठी या अभ्यासाबरोबरच सदैव स्वत:ला अपडेट ठेवणं आणि आपली लेखन-वाचन कौशल्य वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. करिअर म्हणून गांभीर्यानं या क्षेत्राचा विचार करणार असाल तरच या खडतर वाटेनं गेलेलं मात्र बरं.!

-------**-------

बॅचलर ऑफ सोशल वर्क

समाजसेवा करायची आहे, सामाजिक संस्थेत काम करायचं आहे तर त्यासाठी पदवीनंतर मास्टर्स इन सोशल वर्क म्हणजे एमएसडब्ल्यूच करता येतं, असं काही नाही. बारावीनंतरच तुम्ही या विषयातली पदवीही घेऊ शकता. तीन वर्षांचा हा अभ्यासक्रम तुम्हाला थेट करिअरच्या एका विशेष वाटेवर घेऊन जाऊ शकतो. त्यातही तुम्हाला जर देशातल्या नामांकित कॉलेजात प्रवेश मिळाला तर तुम्हाला सोशल वर्क या गोष्टीचा मोठा दृष्टिकोनही मिळू शकतो.

मुंबईतल्या टाटा समाज विज्ञान संस्थेत जर तुम्हाला प्रवेश मिळाला किंवा पुण्याच्या कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्कमध्ये जर शिकता आले, तर ती तुमच्या आयुष्यातली शिकण्याच्या आनंदाची महत्त्वाची तीन वर्षे ठरावी.

पात्रता काय.?

बारावी उत्तीर्ण.

मात्र या नामांकित संस्थांच्या राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणार्‍या प्रवेश परीक्षा या अत्यंत अवघड असतात. त्यात मिळालेल्या गुणांनुसार प्रवेश निश्‍चिती होते. मात्र महाराष्ट्रात अनेक विद्यापीठांतही हा अभ्यासक्रम शिकवला जातो. खासगी महाविद्यालयातून करताना मात्र फी किती आकारली जाते, याची खात्री करून घ्या.

स्कोप काय.?

सामाजिक संस्थांचं वाढतं जाळं आणि त्यात आवश्यक मनुष्यळ याचे प्रमाण पाहता या क्षेत्रात रोजगाराची संधी आहे. मात्र खरंच समाजकार्याची आवड असेल तर आणि तरच या क्षेत्रात या, केवळ पैसा कमावणे हा या क्षेत्रात काम करण्याचा उद्देश असू नये.
सौजन्य:- लोकमत
   

२ टिप्पण्या: