बुधवार, २९ ऑगस्ट, २०१२

विविध राज्यांतील गणेश

विविध राज्यांतील गणेश काश्‍मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देशभरात अनेक ठिकाणी गणेशस्थाने आहेत. त्यांपैकी काही परिचित, तर अनेक अपरिचित आहेत. त्यांपैकी काही स्थानांची थोडक्‍यात माहिती 

गोवा 
खांडोळ्याचा गणपती कामाक्षीदेवी कामरूपहून (आसाम) गोव्यात आली, त्याचप्रमाणे हा गणपतीही तिकडूनच आला अशी लोकांची श्रद्धा आहे. तिसवाडी तालुक्‍यात दिवाडी गावाच्या नावेली येथे हा गणपती होता. 1560मध्ये या गणपतीची मूर्ती फोंडे तालुक्‍यातील खंडेपार येथे आणण्यात आली. नावेलीचे शेणवी नावेलकर हे गणेशभक्त. गणेशाची मूर्ती हलविल्याने त्यांना खंडेपार येथे जाणे अवघड होऊ लागले.एका धनत्रयोदशीच्या रात्री नावेलकर मंडळींनी ही मूर्ती खंडेपार येथून पळविली. दिवाळीच्या पहाटे खंडेपारकरांना देवळात मूर्ती दिसेना म्हणून ते मूर्ती शोधण्यासाठी निघाले. भाणस्तारच्या खाडीतून मूर्ती नेताना नावेलकरांना त्यांनी पकडले. दोघांत प्रचंड वादावादी झाली, नंतर ठरले की दोघांनाही येण्याजाण्यासाठी सोयीच्या ठिकाणी मूर्ती ठेवावी. त्यानुसार पणजी व फोंड्यापासून सारख्या अंतरावर असलेल्या खांडोळे या गावी मूर्तीची स्थापना करण्यात आली. नरक चतुर्दशीच्या दिवशी मूर्ती गावातून गेली म्हणून शेणवी खंडेपारकर अजूनही दिवाळी साजरी करत नाहीत, तर दिवाळीच्या दिवशी मूर्ती गावी आणता आली नाही म्हणून नावेलकरही दिवाळी साजरी करत नाहीत. कार्तिक शुद्ध प्रतिपदेला समेट झाल्याने दोन्ही घराण्यांत दीपोत्सव साजरा करण्यात येतो. या गणपतीचे मंदिर खांडोळ्याला डोंगराच्या पायथ्याशी नारळांच्या आगरात आहे. पाषाणाची भव्य गणेशमूर्ती विराजमान आहे. 
पुनळेकरांचा गणपती 
बार्देश महालात बस्तांदे येथे पुतळे वाडी आहे. तेथे गणपतीचे देऊळ होते. ते पोर्तुगिजांनी उद्‌ध्वस्त केले. त्यामुळे तेथील मूर्ती पेडणे महालातील धारगळ गावी नेण्यात आली. या गणपतीस पुनळेकरांचा गणपती म्हणतात. 
हरमलचा गणेश 
हरमल येथे इतिहासप्रसिद्ध नारायणाचे देऊळ आहे. ते आता पडक्‍या स्थितीत आहे. या मंदिरात गणेशाची स्थापना केली आहे. पोर्तुगिजांनी गणेशपूजनास बंदी घातल्याने भिंतीवरील चित्राची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली. अजूनही काही सारस्वत कुटुंबे कागदावरील गणपतीचे पूजन भाद्रपदात करतात.

कर्नाटक कौण्डिण्य महागणपती 
कुरुडुमळे (जि. कोलार) या गावात हे गणपती मंदिर आहे. कौण्डिण्य ऋषींचा आश्रय या ठिकाणी होता, त्यामुळे याला "कौण्डिण्य क्षेत्र' असेही संबोधिले जाते. त्रिपुरासुराशी लढायला जाण्यापूर्वी ब्रह्मा,विष्णू व महेश आणि इतर देवांनी या ठिकाणी महागणपतीची आराधना केली होती, म्हणून याला गणेशगिरी किंवा कुटाचल असेही संबोधले जाते. येथील महागणपतीचे दर्शन घेतल्याशिवाय गणेशयात्रा पूर्ण होत नाही, अशी धारणा आहे. मंदिराच्या मुख्य देवळाच्या गर्भगृहात महागणपतीची मूर्ती नऊ फूट उंचीची असून, हिरव्या संगमरवराची आहे.
इडगुंजी महागणपती इडगुंजी गावातील हा गणपती पंचखाद्यप्रिय महागणपती म्हणून ओळखला जातो. हे गाव गोकर्ण क्षेत्रापासून 25 मैलांवर आहे. एकदा नारद पार्वतीकडे गेले होते, तेथे गणपती गोड खाऊसाठी रडत होता. त्या वेळी नारदांनी आश्‍वासन दिले, की तुला रोज पंचखाद्य इत्यादी गोड खाऊ देववितो, तू माझ्याबरोबर शरावती काठी इडाकुंज क्षेत्री चल. पुढे तेथे विश्‍वकर्म्याने गणेशाची स्थापना केली,अशीकथा आहे. ही गणेशाची द्विहस्त मूर्ती आहे. बालब्रह्मचारी रूपातील ही मूर्ती आहे. विशेष म्हणजे या मूर्तीचे डोळे अतिशय बारीक असून, दोन्ही सुळे सारख्या आकाराचे आहेत. इडलीसारखा पदार्थ मूर्तीच्या चारी बाजूंनी डोक्‍यापर्यंत अर्पण करण्याची पद्धत येथे आहे. दुपारच्या आरतीच्या वेळी पंचखाद्य नैवेद्य दाखविण्याची पद्धत आहे.

गोकर्ण 
राक्षसाधीश रावणाच्या हातून शंकराचे आत्मलिंग वाचविणारा ब्राह्मण बटूच्या रूपातील गणेश म्हणून गोकर्णच्या गणेशाची ख्याती आहे. ही दोन हाती उभी सुमारे पाच फूट उंचीची पाषाणमूर्ती आहे. ही मूर्ती पाचव्या शतकातील असावी. या मूर्तीला मुकुट नाही. रावणाने ठोसा मारल्याची खूण या मूर्तीच्या डोक्‍यावर दाखविली जाते. हा गणपती गोकर्ण महाबळेश्‍वरच्या आवारातच; पण स्वतंत्र मंदिरात आहे.
तमिळनाडू शंकराचार्यस्थापित गणेश श्रीरंगम स्थानकाच्या जवळच जंबुकेश्‍वराचे मंदिर आहे. त्याच्या शेजारीच जगदंबेचे मंदिर आहे. या मंदिराच्या समोरच गणेशमंदिर आहे. ही मूर्ती शंकराचार्यांनी स्थापन केली आहे. जगदंबेची मूर्ती पूर्वी तेजस्वी आणि उग्र होती. तिचे उग्र तेज शांत करण्यासाठी शंकराचार्यांनी गणेशाची स्थापना तिच्यासमोरच केली अशी कथा सांगितली जाते.
उत्तर प्रदेश धुंडीराज (श्रीक्षेत्र काशी) काशीविश्‍वेश्‍वराच्या मंदिराच्या परिसरात ही गणेशमूर्ती आहे. भारतातील 21 गणेशस्थानांपैकी हे एक स्थान आहे. भस्मासुराचा मुलगा दुरासद याचा नाश करण्यासाठी देवांच्या प्रार्थनेवरून दिव्य अवतार धारण करून त्याचा नाश केला, अशी कथा आहे. काशी क्षेत्रात 56 विनायक असल्याची नोंद आहे.
sakal.com

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा